अरुणाचल प्रदेशमधील चीन सीमेजवळील गावात लष्कराने ‘पीसीओ’ उभारले

इटानगर – भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेजवळील ‘मागो-चुना’ गावात ‘गुगल क्लाऊड मेसेजिंग'(जीसीएम) आधारावर ‘पब्लिक कॉल ऑफिस’ (पीसीओ) उभारले. याआधी या दुर्गम भागातल्या गावकऱ्यांना फोन करण्यासाठी २८ किलोमीटर दूर जावे लागायचे. पण आता त्यांना गावातच संवादाचे माध्यम उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी यासाठी भारतीय लष्कराचे आभार मानले. अरुणाचल प्रदेशमधील सीमेवर चीनच्या हालचाली वाढलेल्या असताना तिथल्या दुर्गम गावांचा विकास महत्त्वाचा ठरतो.

'पीसीओ'

अरुणाचलच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात ‘मागो चुना’ गाव आहे. या गावात राहणाऱ्यांना चीनच्या सीमेपासून आजूबाजूच्या प्रदेशाचे सखोल ज्ञान आहे. अरुणाचल सीमेजवळील चीनी सैनिकांच्या वाढत्या हालचालींबद्दल आधी हे गावकरीच भारतीय जवानांना माहिती देतात. त्यामुळे लष्करासाठी या माणसांचे मोल खूप आहे. पण या गावात संवादाचे माध्यम नव्हते. फोन करण्यासाठी गावकऱ्यांना २८ किलोमीटर चालत जावे लागायचे. याचा गावकऱ्यांच्या समाजजीवन आणि गावाच्या विकासावर परिणाम होत होता.

'पीसीओ'भारतीय लष्कराने या गावकऱ्यांसाठी ‘पीसीओ’उभारुन दिल्यामुळे गावकऱ्यांना आनंद झाला आहे. त्याचवेळी या गावात नव्या संधी उपलब्ध होतील आणि गावाचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. दरम्यान, हे गाव आसामच्या सीमेपासूनही जवळ असल्यामुळे सामरिकदृष्टया त्याचे महत्त्व वाढले आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव आहेच. पण गेल्या काही दिवसात अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरही चीनच्या हालचाली वाढत चालल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमेवर राहणारे नागरिक भारताचे कान, नाक, डोळे असून भारताची स्टॅटर्जीक ऍसेट ठरतात, असे म्हणाले होते. यापार्श्वभूमीवर सीमेवरील या दुर्गम गावात सुरु करण्यात आलेल्या पीसीओचे महत्व वाढते.

leave a reply