काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ जप्त 

श्रीनगर – रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत ‘सीमा सुरक्षा दला’ने (बीएसएफ) अमली पदार्थांसह शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त केला आहे. दहशतवादी हा साठा सीमेपलीकडून घेऊन येत असताना बीएसएफने हे प्रयत्न उधळून लावले आहेत. गेल्या महिनाभरात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत अमली पदार्थांची, शस्त्रास्त्रांची तस्करी पकडण्याची ही चौथी घटना आहे.

शस्त्रास्त्रे

शनिवारी रात्री अरनिया सेक्टर मध्ये सीमेपलीकडून तारेचे कुंपण कापून तीन ते चार दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करीत होते. बीएसएफच्या जवानांनी या दहशतवाद्यांना पाहताच  गोळीबार केला. यामुळे दहशतवादी पुन्हा माघारी पळाले. या भागात शोध घेत असताना सुरक्षा दलाच्या जवानांना अमली पदार्थांची ५८ पाकिटे  सापडली. या पाकिटात अमली पदार्थ होते. याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सीमासुरक्षा दलाने ट्विट करत ही माहिती दिली. घटनास्थळावरून दोन पिस्तुल्स व चार मॅगझीनही जप्त करण्यात आल्या आहेत.

शस्त्रास्त्रेगेल्या महिनाभरात भारत पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तान  मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी करीत असून भारतीय सुरक्षा दलाने हे सर्व प्रयत्न उधळून लावले आहेत. रविवारी अमली पदार्थांच्या तस्करीचा हा चौथा प्रयत्न होता. या आधी ८ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या सीमारेषेवरून भारतात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना बीएसएफच्या जवानांनी ठार केले होते. तसेच पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अमली पदार्थांची तस्करी उधळून लावण्यात आली होती.

leave a reply