युक्रेन युद्धातून घेतलेले धडे तैवान मुद्यावर महत्त्वाचे ठरतील

-ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस

लंडन – ‘पाश्चिमात्य देश व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांनी तैवानच्या सुरक्षेबाबत खात्री करून घेणे गरजेचे आहे. युक्रेनमधून मिळालेल्या धड्यातून शिकणे आवश्यक ठरते. युक्रेनकडे बचावाची पूर्ण क्षमता असण्याची खात्री आपण आधीच करून घ्यायला हवी होती. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आक्रमणापासून रोखण्यात मदत झाली असती. संरक्षणसज्जतेच्या माध्यमातून आक्रमण रोखण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करायला हवी होती. हेच धोरण तैवानसह इतर सार्वभौम राष्ट्रांसाठीही लागू करायला हवे’, अशा शब्दात ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी पाश्चिमात्य देशांना तैवानच्या मुद्यावर सज्ज राहण्याचा सल्ला दिला.

Taiwan-issueब्रिटीश परराष्ट्रमंत्र्यांच्या या सल्ल्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘ट्रुस यांच्या वक्तव्यांमधील सामान्य जाणिवांचा अभाव व उर्मटपणा आश्चर्यकारक आहे. भविष्यात त्यांच्याकडून अशी बेजबाबदार विधाने होणार नाहीत अशी आशा आहे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झआ लिजिअन यांनी बजावले. चीनने या मुद्यावर ब्रिटनकडे अधिकृत तक्रार नोंदविल्याची माहितीही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

गेल्या काही महिन्यात चीन तैवानच्या मुद्यावरून अधिक आक्रमक होत असल्याचे संकेत मिळत आहेत. चीनच्या तैवानविरोधी हालचालींची पाश्चिमात्य देशांसह जपान तसेच ऑस्ट्रेलियाने गंभीर दखल घेतली आहे. या देशांनी तैवानला अधिकाधिक सहकार्य करतानाच चीनवर कठोर शब्दात टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीन अधिकच अस्वस्थ असून ट्रुस यांचा सल्ला व त्यावरील प्रतिक्रिया त्याचाच भाग दिसतो.

leave a reply