2 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत विक्रांतच्या सहभागासह नौदलाला नवे निशाण मिळणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 सप्टेंबर रोजी स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका विक्रांत नौदलात सहभागी करून घेणार आहेत. ही ऐतिहासिक घटना ठरेल, असे नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच भारतीय नौदलाचे नवे निशाण यावेळी प्रदर्शित करण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. पारतंत्र्याच्या काळातील चिन्हे मागे टाकून भारताच्या गौरवशाली आरमारी इतिहासाचा वारसा याद्वारे जगासमोर आणला जाईल, असे सांगितले जाते.

participation of Vikrantभारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू युद्धनौका आहे. तर विक्रांतच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून चाळीस हजार टनाहून अधिक वजनाची विक्रांत भारतीय नौदलात सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. 2 सप्टेंबर रोजी विक्रांत भारतीय नौदलात सहभागी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. भारतीय बनावटीच्या या विमानवाहू युद्धनौकेचा नौदलातील सहभाग ही ऐतिहासिक घटना ठरते, असे सांगून नौदलाने आपल्या निवेदनात याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

एकाच वेळी दोन विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. यामुळे नौदलाची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार असून याचे फार मोठे सामरिक लाभ देशाला मिळणार आहेत. मुख्य म्हणजे 40 हजार टनाहून अधिक वजन असलेली ही युद्धनौका देशातच उभारण्यात आली, ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. याद्वारे भारताने आपली क्षमता सिद्ध केल्याचे दिसत आहे. अत्याधुनिक यंत्रणा व क्षमतेने सज्ज असलेल्या विक्रांतच्या उभारणीसाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

चीनच्या नौदलाने भारताचा नैसर्गिक प्रभाव असलेल्या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी चीनने आपल्या नौदलाची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढविली होती. शेकडो वर्षात कुठल्याही देशाने अशारितीने अल्पावधीत आपल्या नौदलाच्या क्षमतेत एकाएकी वाढ केल्याचे उदाहरण सापडत नाही. भारताच्या नौदल अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात आणून दिली होती. यामुळे भारताला आपल्या नौदलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ करण्यासाठी झपाट्याने पावले उचलणे भाग होते.

यामुळेच भारतीय नौदलासाठी आणखी एक विमानवाहू युद्धनौका उभारण्याचा निर्णय झाला. मात्र स्वदेशी बनावटीची युद्धनौका उभारण्यात भारताला मिळालेले हे यश लक्षणीय ठरते. साऱ्या जगाने याची दखल घेतल्याचे दिसत आहे. लवकरच विक्रांतवर तैनात करण्यासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने देखील नौदलाकडून खरेदी केली जाणार आहेत. यासाठी फ्रान्सच्या डॅसॉल्ट कंपनीची रफायल विमाने व अमेरिकेच्या बोईंग कंपनीचे एफ-18 विमानांमध्ये स्पर्धा आहे. भारताच्या युद्धनौकेवर तैनात करणे सोपे जावे, यासाठी बोईंग कंपनीने आपल्या एफ-18 हॉर्नेट विमानांमध्ये फेरबदल केल्याचेही समोर आले होते.

भारतीय नौदल अशारितीने आपल्या सामर्थ्य व क्षमतेत वाढ करीत असताना, नौदलासाठीचे नवे निशाण प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला आहे. 2 सप्टेंबर रोजी ‘आयएनएस विक्रांत’च्या नौदलातील अधिकृत सहभागाबरोबरच हे नवे निशाण जगासमोर येईल. ब्रिटिशांच्या काळातील चिन्हे मागे सारून नवे निशाण भारताच्या आरमारी वारसा जगासमोर आणेल, असे दावे केले जातात.

leave a reply