इस्रायलविरोधात चौकशी सुरू करून अमेरिकेने गंभीर चूक केली

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा

israel shireen abu aqlaजेरूसलेम – महिला पत्रकार शिरीन अबू अक्ला हिच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश अमेरिकेच्या न्यायविभागाने दिले आहेत. इस्रायलच्या सविस्तर तपासानंतरही अमेरिकेने याप्रकरणी चौकशी सुरू करून गंभीर चूक केल्याचा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. त्याचबरोबर या चौकशीत इस्रायल अमेरिकेला अजिबात सहकार्य करणार नसल्याचे गांत्झ यांनी ठणकावले. ११ मे रोजी वेस्ट बँकच्या जेनिन शहरात इस्रायली संरक्षणदलाचे जवान दहशतवादविरोधी कारवाई करीत होते. अल-जझिरा या अरब वृत्तवाहिनीसाठी पत्रकारिता करणारी शिरीन अबू अक्ला सदर कारवाईचे चित्रिकरण करीत होती. त्यावेळी झालेल्या गोळीबारात महिला पत्रकाराचा बळी गेला. यासाठी इस्रायली लष्कर जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात इस्रायलने देखील याप्रकरणी सविस्तर चौकशी करून इस्रायली जवानांच्या चुकीमुळे शिरीन यांचा बळी गेल्याचे मान्य केले होते.

यानंतर सदर प्रकरण शांत झाले होते. पण अचानक दोन महिन्यानंतर अमेरिकेच्या न्यायविभागाने याची चौकशी सुरू केली. इस्रायलचे विद्यमान संरक्षणमंत्री गांत्झ यांनी यावर संताप व्यक्त करून इस्रायलचे सरकार आपल्या जवानांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. तसेच इस्रायलच्या अंतर्गत मुद्यांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नसल्याचे गांत्झ यांनी बजावले.

leave a reply