आणखी तीन रफायल विमाने देशात दाखल होणार

तीन रफायलनवी दिल्ली – आणखी तीन रफायल विमानांनी फ्रान्समधून भारतात दाखल होण्यासाठी उड्डाण केले आहे. सलगपणे उड्डाण करून ही विमाने भारतात दाखल होतील. संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) ताफ्यात असलेल्या एमआरटीटी विमानांद्वारे यात हवेतल्या हवेत इंधन भरले जाईल, अशी माहिती फ्रान्समधील भारतीय दूतावासाने दिली. या रफायल विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायुसेनेचे बळ अधिकच वाढेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.

भाररताने फ्रान्सबरोबर करार करून ३६ रफायल विमानांची खरेदी केली होती. ५९ हजार कोटी रुपयांच्या या कराराकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधले गेले. हा करार केल्यानंतर चार वर्षांनी २०२० सालच्या जूलै महिन्यात पाच रफायल विमानांचा ताफा भारतात दाखल झाला होता. त्यानंतर २०२० सालच्या नोव्हेंबर महिन्यात भारताला रफायल विमानांचा दुसरा ताफा मिळाला. आता तिसर्‍या खेपेत तीन आणखी रफायल विमाने भारतात दाखल होत आहेत.

भारत फ्रान्सकडून आणखी ३६ रफायल विमाने खरेदी करण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ही विमाने भारताला अधिक स्वस्त पडतील. कारण या विमानांमध्ये भारताला आवश्यक असलेली जोडणी करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही, असे फ्रान्सने म्हटले होते. तर काही दिवसांपूर्वी वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी भारत खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ११४ लढाऊ विमानांच्या यादीमध्ये रफायलचाही समावेश असल्याचे घोषित केले होते.

भारताने हा करार केला तर ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत भारतात रफायल विमानांची निर्मिती करण्याची तयारी फ्रान्सने दाखविलेली आहे. यानुसार सदर विमानांचे ७० टक्के भाग भारतातच तयार होतील, असे फ्रान्सने म्हटले होते. त्याचवेळी या विमानांच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याची तयारीही फ्रान्सने दाखविली होती. यामुळे भारताची फ्रान्सबरोबर धोरणात्मक भागिदारी अधिकच दृढ होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो. पण अद्याप या आघाडीवर भारताने निर्णय घेतलेला नाही.

leave a reply