लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी

- भारत व चीनमधील चर्चेची 12 वी फेरी

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करामध्ये चर्चेची 12 वी फेरी शनिवारपासून सुरू होत आहे. या चर्चेच्या आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी भारताचा दौरा केला होता. त्यांनी लोकशाही तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य यांना असलेल्या धोक्याबाबत सूचक उद्गार काढले होते. त्यावर चीनने आक्षेप नोंदविला होता. त्याचा प्रभाव या चर्चेवर होण्याची दाट शक्यता समोर येत आहे. सदर चर्चेत चीनने गोग्रा, हॉट स्प्रिंग इथून माघार घ्यावी, या मागणीवर भारत ठाम राहणार असल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते.

लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी - भारत व चीनमधील चर्चेची 12 वी फेरीलडाखच्या एलएसीवरील मॉल्दो येथील चीनच्या ताब्यात असलेल्या चौकीवर दोन्ही देशांचे लष्करी नेते चर्चा करतील. शनिवारी सकाळपासून सुरू होणार्‍या या चर्चेकडे भारत व चीन अत्यंत गंभीरपणे पाहत आहेत. सीमावादावर चर्चा कायम ठेवून देखील भारत व चीन परस्परांशी सहकार्य करू शकतात, असे सांगून चीनने सीमेवरील तणावाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सीमेवर हजारो सैनिकांची तैनाती ठेवून दोन्ही देशांचे संबंध सुरळीत होऊ शकत नाही, हे भारताने चीनला स्पष्टपणे बजावले होते. भारताने स्वीकारलेल्या ठाम भूमिकेमुळे चीनला या सीमावादात चलाखी दाखविण्याचा अवसरच मिळालेला नाही. त्यामुळे चीनची कोंडी झाल्याचे दिसते आहे.

चीनवर हुकूमशाही गाजविणार्‍या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतातील चिनी दूतावासाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भारत आणि चीनने लडाखच्या एलएसीवरून सैन्य माघारी घेतले, याकडे चीनच्या राजदूतांनी लक्ष वेधले. मात्र अजूनही काही भागांमध्ये चीनचे जवान तैनात आहेत, ही बाब चिनी राजदूतांनी जाणीवपूर्वक दडविली. आपल्या देशाला भारताबरोबर सौहार्द अपेक्षित असल्याचा प्रचार चीन सातत्याने करीत आहे. तर दुसर्‍या बाजूला भारत आक्रमकाच्या भूमिकेत असल्याचा कांगावा चीनने सुरू केला आहे. मात्र चीनच्या या प्रचारतंत्राचा भारताच्या भूमिकेवर परिणाम झालेला नाही. लडाखच्या गोग्रा व हॉट स्प्रिंग येथून माघार घेतल्याखेरीज दोन्ही देशांचे संबंध सुरळीत होणार नाही, याची जाणीव भारत चीनला सातत्याने करून देत आहे.

भारताची मागणी मान्य करून इथून आपले जवान माघारी घेतल्याने आपल्या प्रतिष्ठेला बाधा येईल, असा चीनचा समज आहे. म्हणूनच भारतावरील दडपण वाढविण्यासाठी चीन आपल्या हद्दीत अतिरिक्त तैनाती करीत आहे. त्याचवेळी इथल्या हवामानाची सवय असलेल्या तिबेटी तरुणांची चीन जबरदस्तीने लष्करात भरती करीत असल्याची बाबही समोर आली आहे.

leave a reply