उत्तर प्रदेशमधील प्रस्तावित ‘टॉय पार्क’ला जोरदार प्रतिसाद

लखनऊ – पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ योजने अंतर्गत देशात ‘टॉय मॅन्युफॅक्चरिंग’साठी केलेल्या आवाहनाला उत्तर प्रदेशमधून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा भागात उभारल्या जाणार्‍या औद्योगिक प्रकल्पासाठी तब्बल ९२ उद्योजकांनी अर्ज पाठविले आहेत. ‘यमुना एक्सप्रेस्वे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी’चे (वायईआयडीए) संचालक अरूण वीर सिंग यांनी याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये ‘टॉय मॅन्युफॅक्चरिंग हब’ सुरू करण्याची घोषणा झाली होती.

उत्तर प्रदेशमधील प्रस्तावित ‘टॉय पार्क’ला जोरदार प्रतिसादसध्या देशातील खेळण्यांच्या बाजारपेठेत ९० टक्के खेळणी चीन व तैवानमधून आयात केली जातात. यापैकी चिनी बनावटीची खेळणी निकृष्ट दर्जाची असून या खेळण्यांसाठी वापरलेले कृत्रिम रंग लहान मुलांसाठी अपायकारक असल्याचे उघड झाले होते. पण भारतीय बनावटीच्या खेळण्यांच्या तुलनेत चिनी खेळणी स्वस्त असल्यामुळे त्यांना अधिक मागणी मिळत होती. मात्र, गलवानमध्ये चिनी लष्करासोबत झालेल्या संघर्षानंतर भारतातील चिनी उत्पादनांवरील बंदीच्या मागणीने जोर पकडला असून देशी बनावटीच्या वस्तूंसाठी मागणी केली जात आहे.

केंद्र सरकारने देखील चिनी खेळण्यांच्या आयात शुल्कात वाढ केली व खेळण्यांच्या देशांतर्गत निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातील ‘टॉय असोसिएशन’नेही चिनी बनावटीच्या खेळण्यांवर बंदी टाकण्याची मागणी याआधी केली होती. याचे सकारात्मक परिणाम पहायला मिळत आहेत. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशी खेळण्यांना चालना देण्यासाठी शंभर एकर जागेत ‘टॉय पार्क’ उभारण्याची घोषणा केली होती.

उत्तर प्रदेशमधील प्रस्तावित ‘टॉय पार्क’ला जोरदार प्रतिसादया प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून यासाठी देशातील छोट्या-बड्या उद्योजकांना घेण्याचे आवाहन केले होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून यासाठी निविदा स्वीकारण्याची प्रक्रीया सुरू झाली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून ‘वायईआयडीए’च्या प्रशासनाने प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली होती. ‘वायईआयडीए’चे संचालक अरूण वीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीन आठवड्यांच्या कालावधीत ९२ उद्योजकांनी प्रस्ताव पाठविले असून यामध्ये ‘फन झू’, ‘अंकित टॉयज्’, ‘फन राईड’ आणि ‘टॉय ट्रेझर्स’ या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

वायईआयडीएने जाहीर केलेल्या योजनेत १५५ भूखंड आहेत. या भूखंडाचे वाटप पुढील महिन्यात ‘ड्रॉ’द्वारे करण्यात येईल अशी माहिती वायईआयडीएच्या संचालकांनी दिली आहे.

leave a reply