तुर्कीने अरब देशांच्या कारभारात लुडबूड करू नये

‘युएई’ने तुर्कीला फटकारले

दुबई – ‘धमक्या आणि घुसखोरीच्या जोरावर संबंध प्रस्थापित केले जात नाहीत. हे ओळखून तुर्कीने अरब देशांच्या कारभारात लुडबूड करू नये’, अशा शब्दात संयुक्त अरब अमिरातने (युएई) तुर्कीला फटकारले. काही तासांपूर्वी तुर्कीने लिबिया आणि सिरिया प्रकरणी ‘युएई’ला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उत्तर दिले जाईल, असे धमकावले होते. त्यावर युएई कडून ही जळजळीत प्रतिक्रीया उमटली आहे.

Arab-Turkiतुर्कीचे संरक्षणमंत्री हुलूसी अकार यांनी काही तासांपूर्वी आखाती वृत्तवाहिनीशी बोलताना लिबिया आणि सिरियातील संघर्षासाठी संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि इतर अरब देश जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. युएई लिबिया आणि सिरियामध्ये बंडखोर गटांना तसेच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अकार यांनी केला होता. या व्यतिरिक्त युएई तुर्कीविरोधी दहशतवादी संघटनांना समर्थन देत असल्याचे अकार यांनी या मुलाखतीत म्हटले होते.

युएईबरोबरच तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी लिबियातील संघर्षासाठी सौदी अरेबिया, इजिप्त आणि रशियालाही जबाबदार धरले. ’युएई, सौदी, इजिप्त, फ्रान्स आणि रशियाने हफ्तार बंडखोरांच्या सहय्याने लिबियात सरकारविरोधी बंड घडविण्याचा प्रयत्न केला तर लिबियातील परिस्थिती चिघळेल आणि येथील संघर्षात भर पडेल’, असा इशारा अकार यांनी दिला होता. तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या या धमकीला ’युएई’चे परराष्ट्रमंत्री अन्वर गरगाश यांनी प्रतुत्तर दिले.

Arab-Turkiतुर्कीचे संरक्षणमंत्री अकार यांनी केलेल्या विधानाने या देशाच्या घरसरत्या राजकारणातील खालची पातळी गाठल्याची टीका गरगाश यांनी केली. त्याचबरोबर तुर्कीच्या वसाहतवादी धोरणांना जगात कुणीही थारा देणार नसल्याचे सांगून युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तुर्कीच्या लिबिया तसेच सिरियातील कारवायांवर ताशेरे ओढले. त्याचबरोबर तुर्कीने अरब देशांच्या कारभारात हस्तक्षेप करु नये, असेही बजावले. काही दिवसांपू्र्वी इजिप्तने देखील लिबिया प्रकरणी तुर्कीला फटकारले होते.

leave a reply