रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अर्थव्यवस्थेला अनपेक्षित घसरणीचा धक्का

रशिया-युक्रेनवॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी महागाई व सरकारी खर्चात झालेली घट यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेत अनपेक्षित घसरण झाली आहे. २०२२ सालच्या पहिल्या तिमाहित अमेरिकेचा ‘जीडीपी’ १.४ टक्क्यांनी खाली आला आहे. २०२१ सालच्या अखेरच्या तिमाहित अर्थव्यवस्थेत ६.९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेतील घसरण अधिकच धक्कादायक ठरली आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे अडचणीत आलेल्या बायडेन प्रशासनासाठी अर्थव्यवस्थेतील घसरण डोकेदुखी वाढविणारी ठरेल, असे संकेत विश्लेषकांकडून देण्यात येत आहेत.

गुरुवारी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने २०२२ सालातील पहिल्या तिमाहिचा अहवाल सादर केला. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील महागाई आधीच विक्रमी स्तरावर भडकली आहे. त्यात अमेरिकेत विदेशी उत्पादनांची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर अमेरिकी उत्पादनांना परदेशात असलेली मागणी घटली आहे. त्यामुळे अमेरिकेची व्यापारी तूट प्रचंड प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले. याचा मोठा फटका आर्थिक विकासदराला बसला आहे.

दुसऱ्या बाजूला रशिया-युक्रेन युद्ध व चीनमधील कोरोनाचे उद्रेक यामुळे अमेरिकी उद्योगक्षेत्राला फटके बसत आहेत. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे परिणाम अमेरिकी कंपन्यांवर होत आहेत. यात शेती व इंधन उद्योगातील कंपन्यांचा समावेश आहे. त्याचवेळी कोरोनाची व्याप्ती कमी झाल्याने त्या अनुषंगाने सरकारकडून होणाऱ्या खर्चातही घट झाली आहे. हा घटकदेखील जीडीपीवर परिणाम करणारा ठरल्याचे सांगण्यात येते. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील घसरण २०२० सालानंतरची पहिलीच घसरण ठरली आहे.

अमेरिकी अर्थव्यवस्थेचा विकासदर एक टक्क्यांपर्यंत असेल, असे भाकित विश्लेषकांकडून करण्यात आले होते. मात्र सरकारच्या आकडेवारीने अनेकांना धक्का बसला आहे. ही घसरण अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची सुरुवात किंवा संकेत असू शकतात, असा दावा विश्लेषक करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेतील आघाडीचे तज्ज्ञ, अधिकारी तसेच विश्लेषकांनी मंदीबाबत इशारे दिले आहेत.

फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी व्याजदरातील वाढीची माहिती देताना या वाढीमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसू शकतात, असा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ ‘फेडरल रिझर्व्ह’ने अमेरिकेतील घरांच्या सरासरी किंमती व गृहकर्जाचा व्याजदर वाढत असून या गोष्टी गृहबांधणी क्षेत्रातील संभाव्य संकटाची चाहूल ठरु शकते, असे बजावले होते. अमेरिकेतील महागाईचा भडका, अर्थव्यवस्थेवरील कर्जाचा वाढता बोजा हे घटकदेखील अर्थव्यवस्थेतील मंदीसाठी कारणीभूत ठरु शकतात, याकडेही विश्लेषकांनी लक्ष वेधले होते

leave a reply