मुंबईत चोवीस तासात कोरोनाच्या अडीच हजार रुग्णांची नोंद

- नववर्ष घरातच साजरे करण्याचे सरकारचे आवाहन

मुंबई – मुंबईत दरदिवशी सापडत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत २५१० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईतील ही रुग्णवाढ तिसर्‍या लाटेची सुरुवात ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जाते. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर नवी नियमावली जाहीर केली. नागरिकांनी घरात राहून नववर्ष साजरे करावे. मुंबईतील चौपाट्या व इतर समुद्र किनारी गर्दी करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले आहे. तर राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेतही सरकारने दिले आहे.

मुंबईत चोवीस तासात कोरोनाच्या अडीच हजार रुग्णांची नोंद - नववर्ष घरातच साजरे करण्याचे सरकारचे आवाहनकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मुंबईत दरदिवशी सापडत असलेल्या रुग्णांची संख्या ११ हजारांच्या पुढे पोहोचली होती. तेथून एप्रिलच्या अखेरीपासून रुग्णसंख्या घटत दरविशी आढळत असलेल्या रुग्णांची संख्या १०० पर्यंत खाली आली होती. पण गेल्या दीड आठवड्यात चित्र पुन्हा पालटू लागल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत चोवीस तासात आढळत असलेल्या रुग्णसंख्येत मोठी उसळी दिसून आली आहे.

सोमवारी मुंबईत ८०९ नवे रुग्ण आढळले होते. तेच मंगळवारी १३७७ नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ७० टक्के अधिक रुग्ण आढळे. तर बुधवारी चोवीस तासात आढळणार्‍या रुग्णांची हीच संख्या २५१० वर पोहोचली. अर्थात बुधवारच्या तुलनेत ८२ टक्के अधिक रुग्ण आढळले आहेत. ८ मे रोजी मुंबईत २६७८ नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर बुधवारी मुंबईत एका दिवसात अडीच हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात आढळत असलेल्या एकूण रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. याबाबतीत आता महाराष्ट्राने केरळलाही मागे टाकले आहे. केरळमध्ये बुधवारी २८०० नव्या रुग्णांची नोंद झाली. तेच महाराष्ट्रात चोवीस तासात २९०० नवे रुग्ण सापडले.

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात केंद्राच्या सुचनेनंतर रात्रीची जमावबंदी लावण्यात आली होती. पण आता हे नियम अधिक कडक केले जाऊ शकतात, असे संकेत सरकारने दिले आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी निर्बंध कडक करण्याबाबत येत्या दोन दिवसांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे.

राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येच्या तुलनेत दरदिवशी बरे होणार्‍या रुग्णांची संख्या कमी झाल्याने ऍक्टिव्ह अर्थात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत एका दिवसात अडीच हजार रुग्ण आढळले असताना केवळ २५१ जण बरे झाले आहेत. राज्यात १० डिसेंबरपर्यंत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही पाच हजारांपर्यंत खाली आली होती. मात्र आता ती १४ हजारांच्या पुढे पोहोचली आहे. मुंबईचा विचार करता २० डिसेंबरला मुंबईत केवळ तीनशे सक्रीय रुग्ण होते. मात्र आता हीच संख्या केवळ ९ दिवसात ३५०० च्या पुढे गेली आहे. दरम्यान, राज्य सरकारने वाढत असलेले कोरोना रुग्ण पाहता नववर्ष सर्वांनी घरात राहूनच साजरे करावे, चौपाट्यांवर गर्दी करु नये असे आवाहन केले आहे. तसेच बंदीस्त सभागृहात आयोजित कार्यक्रम ५० टक्क्यांइतकी, तर खुल्या जागेत क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीचे निर्बंथ लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ व लहान मुलांना घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांबाबतचा निर्णय येत्या काही दिवसात परिस्थिती पाहून घेतला जाईल, असेही संकेत राज्य सरकारतर्फे देण्यात आले.

leave a reply