जुंटा राजवटीच्या हल्ल्यांमुळे पूर्व म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीची भीती

- संयुक्त राष्ट्रसंघटनेचा इशारा

नेप्यितौ – जुंटा राजवटीच्या नेतृत्त्वाखाली म्यानमारच्या लष्कराकडून पूर्व म्यानमारमध्ये क्रूर व अंदाधुंद हल्ले सुरू असून त्यामुळे जवळपास एक लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. लष्कराची कारवाई चालू असल्याने विस्थापितांना जीवनावश्यक सुविधाही उपलब्ध होत नसून, उपासमार व आजारांच्या साथींमुळे प्रचंड जीवितहानी होण्याची भीती आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा इशारा येत असतानाच म्यानमारच्या लष्कराने पूर्व म्यानमारमधील डेमोसो भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्या लष्करी तुकड्या धाडल्याचे वृत्त ‘इरावद्दी न्यूज’ या वेबसाईटने दिले आहे.

Advertisement

जुंटा राजवटीच्या हल्ल्यांमुळे पूर्व म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीची भीती - संयुक्त राष्ट्रसंघटनेचा इशाराम्यानमारच्या अनेक भागांमध्ये स्थानिक जनतेने लष्कराविरोधात संघर्ष सुरू केला आहे. काही भागांमध्ये नवे सशस्त्र गट तयार झाले असून जुन्या बंडखोर गटांनीही पुन्हा शस्त्रे हाती घेतल्याचे समोर आले आहे. या सशस्त्र गटांना संपविण्यासाठी म्यानमारच्या लष्कराने विविध भागांमध्ये हवाईहल्ले तसेच तोफांचा मारा सुरू केला आहे. पूर्व म्यानमारमध्ये ‘कयाह स्टेट’ प्रांतात, ‘केएनडीफ’ हा बंडखोर गट व नव्याने स्थापन झालेल्या ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’कडून लष्कराविरोधात संघर्ष सुरू आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी म्यानमारच्या लष्कराने गेल्या महिन्यात कारवाई हाती घेतली होती.

या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात हवाईहल्ले व तोफांचा मारा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक जनतेवर गाव सोडून जवळच्या जंगलांमध्ये विस्थापित होणे भाग पडले आहे. विस्थापित झालेल्यांची संख्या जवळपास लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. लष्करी कारवाईमुळे या भागात जीवनावश्यक सुविधा पुरविणार्‍या यंत्रणाही उद्ध्वस्त झाल्या असून विस्थापितांना अन्नपाणी तसेच औषधांची टंचाई भेडसावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जुंटा राजवटीच्या हल्ल्यांमुळे पूर्व म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीची भीती - संयुक्त राष्ट्रसंघटनेचा इशारासंयुक्त राष्ट्रसंघटनेने याची गंभीर दखल घेतली आहे. लष्करी कारवाई अशीच सुरू राहिली, तर या भागात उपासमार व रोगांच्या साथींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी (मास डेथ्स) होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेचे अधिकारी टॉम अँड्य्रुज् यांनी दिला. ही जीवितहानी रोखायची असेल, तर आंतरराष्ट्रीय समुदायाने याची तातडीने दखल घेणै आवश्यक आहे, असेही आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, म्यानमारच्या जुंटा राजवटीने देशातील आघाडीच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की यांच्याभोवती कारवाईचा फास अधिकच आवळला आहे. गुरुवारी म्यानमारच्या ‘मिलिटरी कौन्सिल’ने स्यू की यांच्यावर भ्रष्टाचाराचे नवे आरोप दाखल केल्याचे जाहीर केले. स्यू की यांनी सहा लाख डॉलर्सची रोकड व सोने लाच म्हणून स्वीकारल्याचे यात सांगण्यात आले आहे. स्यू की यांच्यावर ठेवण्यात आलेला हा सहावा व सर्वात गंभीर आरोप असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी त्यांच्यावर राजद्रोह, आयात-निर्यातीचे नियम मोडणे, दूरसंचार कायद्याचा भंग, राष्ट्रीय आपत्ती कायदा मोडणे व नागरी असंतोषाला प्रोत्साहन देणे यासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.

लष्करी विमान दुर्घटनेत 12 जणांचा बळी

गुरुवारी म्यानमारच्या मंडाले भागात एक लष्करी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान 12 जणांचा बळी गेला आहे. त्यात म्यानमारमधील प्रभावशाली बौद्ध भिक्खू भदंत कविसारा यांच्यासह सहा लष्करी अधिकार्‍यांचा समावेश आहे. वैमानिक गंभीर जखमी असून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली. म्यानमारमध्ये फेब्रुवारी महिन्यात लष्कराने बंड घडविल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आघाडीच्या लष्करी अधिकार्‍यांनी बौद्ध भिक्खू भदंत कविसारा यांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे.

leave a reply