इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याच्या आधी अमेरिकेने आखाती देशांशी चर्चा करावी

- सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल

अणुकरार

मनामा – पुढच्या महिन्यात अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर इराणबरोबरचा अणुकरार पुनरूज्जीवित करण्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष नियुक्त ज्यो बायडेन यांनी दिले आहेत. पण तसे करण्याआधी बायडेन यांनी सौदी अरेबिया तसेच इतर आखाती देशांचा सल्ला घ्यावा. अरब देशांना विश्‍वासात घेतल्याखेरीज हा अणुकरार टिकूच शकणार नाही, असा इशारा सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी दिला आहे. अमेरिकेप्रमाणे युरोपिय देशांनी देखील अरब देशांना या चर्चेत सामील करून घ्यावे, असे प्रिन्स फैझल यांनी म्हटले आहे.

अणुकरारगेल्या आठवड्यात ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील माध्यमांशी बोलताना अमेरिका इराणसोबत नवा अणुकरार करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. या नव्या अणुकराराबरोबर इराणवरील निर्बंध शिथिल करण्याचे संकेतही राष्ट्राध्यक्ष नियुक्त बायडेन यांनी दिले होते. यासाठी इराणने आपल्या मागण्या मान्य कराव्या, असा प्रस्ताव बायडेन यांनी ठेवला होता. अमेरिकेतील विश्‍लेषकांनी बायडेन यांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले होते. तसेच 2015 साली झालेला अणुकरार पुनरूज्जीवित होणार असल्याची शक्यता या विश्‍लेषकांनी वर्तविली होती.

बायडेन यांनी दिलेला प्रस्ताव व त्यानंतर इराणने केलेली मागणी यावर सौदी अरेबिया तसेच अरब देशांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. पण बाहरिनच्या मनामा येथे आयोजित ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज्‌’ या अमेरिकी अभ्यासगटाने आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी इराणशी अणुकराराबाबत कुठल्याही वाटाघाटी करताना सौदी अरेबिया व इतर आखाती देशांशी पूर्ण चर्चा झाली पाहिजे, त्यांचा सल्ला घेणे जरूरी असल्याचे बजावले.

अणुकरार

‘अरब देशांबरोबरच्या सल्लामसलतीद्वारेच शाश्‍वत अणुकरारापर्यंत पोहोचता येईल’, असे सांगून प्रिन्स फैझल यांनी याआधीच्या अणुकरारानंतर झालेल्या परिणामांची जाणीव करून दिली. “इराणबरोबरच्या ‘जेसीपीओए’ करारानंतर काय होते, हे सर्वांनीच अनुभवले आहे. क्षेत्रीय देशांनाच या अणुकरारात सहभागी केले नाही तर अविश्‍वास वाढत जातो. गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष होते आणि त्याचा थेट परिणाम सुरक्षेवर होतो”, याची आठवण प्रिन्स फैझल यांनी करुन दिली.

ज्यो बायडेन यांनी इराणशी चर्चा करताना अरब मित्रदेशांशी चर्चा करणार असल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. पण अजूनही बायडेन यांनी सौदी अरेबियाशी संपर्क साधला नसल्याचे प्रिन्स फैझल यांनी म्हटले आहे.

leave a reply