अफगाणिस्तानसाठी तळ नाकारणार्‍या पाकिस्तानला अमेरिकेचा पहिला झटका

वॉशिंग्टन – काहीही झाले तरी अफगाणिस्तानात तालिबानवर हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेला तळ देणार नाही, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत ठणकावले होते. पाकिस्तानातील कट्टरपंथियांनी त्याचे जोरदार स्वागतही केले. पण या आक्रमकतेची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पाकिस्तानचे काही समंजस पत्रकार व विश्‍लेषक देत आहेत. या ‘किंमतीची’ पहिली खेप पाकिस्तानला मिळाली आहे. ‘चाईल्ड लेबर प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट’मध्ये पाकिस्तानचा समावेश करून अमेरिकेने पाकिस्तानला पहिला झटका दिला.

18 वर्षाखालील युवकांचा जवान म्हणून वापर करणार्‍या देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश करून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला पहिली चपराक लगावली. पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत अमेरिकाविरोधी भाषण ठोकून शाबासकी मिळविल्यानंतर, एक दिवस उटलण्याच्या आत अमेरिकेने ही कारवाई केली आहे. अफगाणिस्तान, येमेन, इराक, इराण, दक्षिण सुदान या देशांबरोबर आता पाकिस्तान व तुर्कीचा देखील या यादीत समावेश करण्याचा अमेरिकेचा निर्णय धोरणात्मक असल्याचे दावे पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत.

पुढच्या काळात पाकिस्तानने अमेरिकेकडून अशाच किंवा याहूनही अधिक कठोर कारवाईला तोंड देण्याची तयारी करावी, कारण पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतःहून अमेरिकेला चिथावणी दिलेली आहे, असे या पत्रकारांनी म्हटले आहे. ‘अफगाणिस्तानबाबत निर्णय घेताना पाकिस्तानच्या सरकारने सार्‍या गोष्टी विचारात घेतलेल्या नाहीत. लष्करी तळासाठी अमेरिकेला नकार देत असताना, आपण चीनच्या गटात सहभागी झालो आहोत, असा संदेश पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांना दिला. त्याची काहीच आवश्यकता नव्हती’, असे या पाकिस्तानी पत्रकारांचे म्हणणे आहे.

चीन पाकिस्तानला फार फार तर कर्ज देईल, राजनैतिक पातळीवर सहकार्य देखील करील, हे खरे. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांच्यासह इतर आंतरराष्ट्रीय संस्थांवर अमेरिकेचे वर्चस्व आहे. त्याचा वापर करून अमेरिका पाकिस्तानला सहज जेरीस आणू शकेल, याचा विचारच पाकिस्तानच्या सरकारने केलेला नाही. पंतप्रधान इम्रान खान यांना तर याची जाणीवच नाही. त्यामुळे पाकिस्तानसमोर फार मोठे संकट खडे ठाकले आहे, याकडे पाकिस्तानचे पत्रकार व विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

अमेरिकेच्या विख्यात विश्‍लेषिका लिसा कर्टिस यांनी देखील आता अमेरिकेचे पाकिस्तानबरोबरील संबंध पूर्वपदावर येणे अवघड बनल्याचे बजावले. पाकिस्तानने आपली दहशतवादाबाबतची तसेच चीन व भारतविषयक भूमिका बदलली नाही, तर अमेरिका-पाकिस्तान संबंध सुरळीत होऊच शकणार नाहीत, असे कर्टिस यांनी स्पष्ट केले.

‘युएस पाकिस्तान रिलेशन्स आफ्टर युएस विड्रॉल फ्रॉम अफगानिस्तान’ या विषयावरील परिसंवादात लिसा कर्टिस बोलत होत्या. उघडपणे अफगाणिस्तानात तालिबानला आपण सहाय्य करीत नसल्याचे दावे पाकिस्तान करीत आहे. पण प्रत्यक्षात पाकिस्तान तालिबानला सर्वतोपरी सहाय्य पुरवित आहे. तसे करणे पाकिस्तानच्या हिताचे नाही, कारण तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानात त्याचे पडसाद उमटतील आणि कट्टरपंथिय पाकिस्तानवरच हल्ले चढवतील, असा इशारा कर्टिस यांनी दिला आहे.

leave a reply