अफगाणिस्तानचा गोठविलेला निधी अमेरिका ९/११च्या पीडितांना देणार

गोठविलेला निधीवॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानचे गोठविलेले सात अब्ज डॉलर्स विभागण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी साडेतीन अब्ज डॉलर्स ९/११च्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या अमेरिकी नागरिकांच्या कुटुंबियांना देण्यात येईल. तर उर्वरित साडेतीन अब्ज डॉलर्स अफगाणी जनतेला मानवतावादी सहाय्यासाठी मोकळे केले जातील. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी घेतलेल्या या निर्णयावर तालिबानने टीका केली असून अमेरिकेने अफगाणींचा पैसा चोरल्याचा आरोप केला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर बायडेन प्रशासनाने अफगाणिस्तानचा निधी गोठविला होता. गेली वीस वर्षे अफगाणिस्तानची ८० टक्के अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय निधी व सहाय्यावर अवलंबून आहे. अफगाणिस्तानचा सुमारे नऊ अब्ज डॉलर्स इतका निधी देखील अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, युएई आणि कतार या देशांमध्ये जमा केलेला आहे. यापैकी सात अब्ज डॉलर्स अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेत जमा आहेत.

अफगाणी जनतेसाठी बायडेन प्रशासनाने सदर निधी अफगाणिस्तानच्या बँकेत जमा करावा, अशी मागणी तालिबानने केली होती. अफगाणिस्तान कोसळण्याच्या स्थितीत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने काही दिवसांपूर्वी दिला होता. राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे पाच अब्ज डॉलर्सच्या सहाय्याची मागणी केली होती.

अशा परिस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी ‘एक्झीकेटीव्ह ऑर्डर’वर स्वाक्षरी करून फेडरल रिझर्व्हमध्ये जमा अफगाणिस्तानचा निधी विभागण्याचे जाहीर केले. २० वर्षांपूर्वी अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासाठी साडेतीन अब्ज डॉलर्स पुरविले जातील, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले. तर उरलेले साडेतीन अब्ज डॉलर्स तालिबानच्या हाती न सोपविता अफगाणी जनतेपर्यंत मानवतावादी सहाय्याद्वारे पोहोचविले जातील, असे बायडेन प्रशासनाने सांगितले.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी निर्णय जाहीर केला असला तरी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागू शकतो, असा दावा केला जातो. याआधीच अमेरिकेने ९/११च्या पीडितांसाठी सात अब्ज डॉलर्सचा निधी पुरविला आहे. अशा परिस्थितीत, या पीडितांसाठी ही रक्कम घोषित केल्यामुळे बायडेन यांच्या निर्णयाचे काही प्रमाणात स्वागत केले जात आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या वर्षातच बायडेन यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात घटल्याचे अहवाल माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी बायडेन यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. ९/११चा हल्ला अमेरिकी जनतेसाठी अतिशय संवेदनशील मुद्दा मानला जातो. या हल्ल्याच्या पीडितांसाठी केलेल्या सहाय्याचे अमेरिकेत नेहमीच स्वागत झाले आहे. बायडेन यांच्या निर्णयानंतरही हेच झाले, याकडे अमेरिकी माध्यमे लक्ष वेधत आहेत.

मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलेल्या या निर्णयावर तालिबानने ताशेरे ओढले आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानचा निधी चोरून हीन स्तरावरील काम केले असून या देशाकडे आता नैतिकता नावाची गोष्ट उरलेली नाही, अशी टीका तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद नईम याने केली.

leave a reply