एकटी अमेरिका चीनचा सागरी विस्तार रोखू शकत नाही

- फिलिपाईन्सचे निवृत्त नौदल अधिकारी

विस्तारतैपेई – ‘ईस्ट आणि साऊथ चायना सी क्षेत्रातील चीनच्या लष्करी हालचाली धोकादायकरित्या वाढत आहेत. या क्षेत्राची सुरक्षा कुठलाही एक देश करू शकत नाही, अगदी अमेरिकेलाही चीनचा हा विस्तार रोखणे शक्य नाही. त्यामुळे या क्षेत्राच्या अखंडतेसाठी तैवान, जपान आणि फिलिपाईन्सच्या एकजुटीची आवश्यकता आहे’, असे आवाहन फिलिपाईन्सचे निवृत्त नौदल अधिकारी रेअर ऍडमिरल रोमेल जूड ओंग यांनी केले.

ईस्ट व साऊथ चायना सी क्षेत्रातील ‘फर्स्ट आयलँड चैन’मध्ये येणार्‍या तैवान, जपान आणि फिलिपाईन्सच्या सुरक्षेला चीनच्या सागरी आक्रमकतेपासून धोका असल्याचे ओंग यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले. तैवान, जपान आणि फिलिपाईन्स यांचा संयुक्त लष्करी सराव हा पर्याय नाही, तर ती अनिवार्यता बनलेली आहे, असे ओंग यांनी स्पष्ट केले. कारण तैवान, जपान आणि फिलिपाईन्सची सुरक्षा ही एकमेकांपासून वेगळी नसून परस्परांशी जोडलेली आहे. हे तीनही देश स्वतंत्रपणे चीनचा सागरी विस्तार रोखू शकत नाहीत. पण त्यांनी परस्परांमध्ये सहकार्य प्रस्थापित केले, तर ते शक्य आहे, असा दावा ओंग यांनी केला.

उत्तरेकडील बाशीची समुद्रधूनी फिलिपाईन्ससाठी महत्त्वाची आहे. तर सेंकाकू बेटांची सुरक्षा जपानसाठी अत्यावश्यक आहे. या दोन्ही सागरी क्षेत्रांमध्ये तैवान हा दूवा असल्यामुळे या तीनही देशांचा संयुक्त सराव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असे ओंग यांनी म्हटले आहे. याआधी जपान आणि फिलिपाईन्सचे लष्कर आणि नौदलामध्ये सराव पार पडला होता. पण या तीनही देशांचा स्वतंत्र सराव झालेला नाही.

दरम्यान, अफगाणिस्तानातील मानहानीकारक माघारीनंतर अमेरिकेने मित्रदेशांचा विश्‍वास गमावला आहे. युरोपिय देशांमध्ये अमेरिकेच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. चीनच्या विरोधात आपल्या मित्रदेशांना सहाय्य पुरविण्याची इच्छा अमेरिकेकडे आहे का? अशी शंका घेतली जात आहे. चीन देखील अमेरिकेच्या सैन्यमाघारीकडे बोट दाखवून तैवान व आपल्या विरोधात खड्या ठाकलेल्या इतर देशांना अमेरिकेवर विसंबून राहू नका, असे धमकावत आहे. अशा परिस्थितीत तैवान, जपान आणि फिलिपाईन्सची एकजूट अनिवार्य असल्याचे सांगून निवृत्त नौदल अधिकारी रेअर ऍडमिरल रोमेल जूड ओंग यांनी चीनपासून धोका असलेल्या देशांना संदेश दिला आहे.

leave a reply