अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख इस्रायलमध्ये दाखल

जेरूसलेम – अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड – सेंटकॉम’चे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी शुक्रवारी इस्रायलचा दौरा करून संरक्षणमंत्री बेनी गांत्झ आणि संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांची भेट घेतली. गेल्या दहा दिवसात जनरल मॅकेन्झी यांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे. तर आखाती देशांप्रमाणे इस्रायलला ‘सेंटकॉम’मध्ये सामील करून घेण्याच्या पेंटॅगॉनच्या घोषणेनंतर मॅकेन्झी यांचा हा पहिला इस्रायल दौरा ठरतो.

कतारमध्ये मुख्यालय असलेल्या अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅकेन्झी हे दोन दिवसांच्या इस्रायल भेटीवर आहेत. अमेरिकेने जनरल मॅकेन्झी यांच्या या इस्रायल भेटीबाबत तपशील प्रसिद्ध केलेले नाहीत. पण इराण तसेच आखातातील इतर धोक्यांबाबत चर्चा करण्यासाठी सेंटकॉमचे प्रमुख इस्रायलमध्ये दाखल झाल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली.

तर अमेरिका आणि इस्रायलमधील लष्करी आणि सामरिक सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर, जनरल मॅकेन्झी यांचा हा इस्रायल दौरा अतिशय महत्त्वाचा असल्याचे लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी म्हटले आहे. इराणच्या धोक्याविरोधात अमेरिका आणि इस्रायलमधील हे सहकार्य महत्त्वाचे ठरू शकते, असेही कोशावी म्हणाले.

काही तासांपूर्वीच इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी इराणशी अणुकरार करण्यासाठी उत्सुक असलेल्या अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना इशारा दिला होता. अमेरिकेने ही घोडचूक केलीच तर इस्रायल स्वबळावर इराणवर लष्करी कारवाई करील, असा इशारा कोशावी यांनी दिला होता. तसेच आपल्या लष्करालाही इराणविरोधी हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, जनरल मॅकेन्झी यांच्या सदर इस्रायल दौर्‍याकडे पाहिले जाते.

दोन आठवड्यांपूर्वी पेंटॅगॉनने इस्रायलचे महत्त्व अधोरेखित करून आखाती देशांसाठी स्थापना केलेल्या ‘सेंटकॉम’मध्ये इस्रायलचाही समावेश करण्याची घोषणा केली होती. तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस इस्रायलबाबत घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. त्यानंथर मॅकेन्झी यांनी इस्रायलचा दौरा केला होता. तर अमेरिकेच्या बॉम्बर विमानांनी इस्रायल ते पर्शियन आखात अशी गस्त पूर्ण केली होती.

दरम्यान, अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

leave a reply