अमेरिका व चीनच्या वरिष्ठ नेत्यांची हवाईमध्ये चर्चा  

वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोनाची साथ, साऊथ चायना सी, हॉंगकॉंग व द्विपक्षीय व्यापार यासारख्या अनेक मुद्द्यांवरील मतभेदांनी टोक काढले असतानाच अमेरिका व चीनच्या वरिष्ठ नेत्यांची भेट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर निरंकुश सत्ता गाजविणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीचे ‘फॉरेन पॉलिसी चीफ’ यांग जिएची यांची पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांवर भेट घेतली. कोरोनाची साथ व हॉंगकॉंगच्या पार्श्वभूमीवर अमेरिका चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच झालेली ही भेट लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

अमेरिका, चीन, हवाई

पॅसिफिक महासागरातील अमेरिकेच्या हवाई बेटांवर असलेल्या ‘हिकम एअर बेस’ वर अमेरिका व चीनच्या नेत्यांमध्ये तब्बल सात तास चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या भेटीसाठी समोरुन प्रस्ताव आल्याचे दावे दोन्ही देशांच्या सूत्रांकडून करण्यात आले. चर्चेदरम्यान परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी, बहुतांश मुद्द्यांवर आग्रही भूमिका घेत चीनवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केल्याचे अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

अमेरिका व चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यात चांगलेच चिघळले आहेत. मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडविणार्‍या कोरोना साथीमागे चीनच असल्याचा मुद्दा अमेरिका आक्रमकपणे पुढे रेटत आहे. त्याचवेळी चीनकडून होणारी अमेरिकेची व्यापारी लूट, साऊथ चायना सी मधील कारवाया, हॉंगकॉंग, तैवान, उघुरवंशीय यावरून देखील अमेरिका चीनला घेरण्याचे प्रयत्न करीत आहे. चीनकडून भारतीय सीमेवर निर्माण करण्यात येणाऱ्या तणावाबाबतही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थीचे संकेत दिले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चीनला धारेवर धरीत आहेत. या दोन्ही नेत्यांसह ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ नेते व अधिकारीही चीनला लक्ष्य करीत आहेत. चीनवरील राजनैतिक दडपण वाढविण्यासाठी काही मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. अमेरिकी नेत्यांची आक्रमक वक्तव्ये आणि ट्रम्प प्रशासनाकडून घेण्यात आलेले निर्णय यामुळे दोन्ही देश नव्या शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे दावे विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत.

अशा पार्श्वभूमीवर, अमेरिका व चीनमधील वरिष्ठ नेत्यांची भेट होणे महत्त्वाचे ठरते. अमेरिकेच्या ‘ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूट’ या अभ्यासगटाच्या ‘चायना सेंटर’चे प्रमुख चेंग ली यांनी, या भेटीबद्दल मत व्यक्त करताना ‘निक्सन कमिंग टू चायना मोमेंट’ असे म्हटले आहे. चीनबरोबर कोणत्याही स्वरूपाचे राजनैतिक संबंध नसताना १९७२ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली होती. त्याचा संदर्भ  पॉम्पिओ व यांग जिएची यांच्या भेटीशी जोडला आहे.

अमेरिका व चीन या दोन्ही देशांच्या परराष्ट्र विभागांनी पोम्पिओ व जिएची यांच्या भेटीसंदर्भात स्वतंत्र निवेदने प्रसिद्ध केली असून पुढील काळात संवाद कायम राखण्यावर एकमत झाल्याचा दावा केला आहे. मात्र अधिकृत पातळींवर त्याला दुजोरा देणारी माहिती प्रसिद्ध झालेली नाही.

leave a reply