कोरोनासारख्या साथींचा मुकाबला करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा आवश्यक आहेत

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

नवी दिल्ली – कोरोनासारख्या साथींचा मुकाबला करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा कराव्या लागतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कोरोनाच्या साथीसंदर्भात आयोजित केलेल्या ‘ग्लोबल व्हर्च्युअल समिट’ला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी हे आवाहन केले. साथींवरील लसी आणि त्यांच्यावरील उपचार यांच्यासंदर्भातील जागतिक आरोग्य संघटनेचे नियम बदलण्याची गरज आहे. अशा साथींवरील लसी व औषधे सर्वांनाच समानपणे उपलब्ध असली पाहिजे व यासाठी संकटांना दाद न देणारी मजबूत पुरवठा साखळी उभी करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

भारतात कोरोनाची साथ नियंत्रणात आलेली असली, तरी अजूनही काही देशांमध्ये ही साथ धुमाकूळ घालत आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या 10 लाखांच्याही पुढे गेली आहे. तर चीनमध्ये दरदिवशी कोरोनाचे दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. युरोपिय देशांमध्येही ही साथ नव्याने पसरत असल्याचे दावे केले जातात. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदी यांनी अशा जागतिक महामारींचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनासारख्या साथींच्या विरोधात जागतिक पातळीवर संघटीत प्रतिसादाची अपेक्षा आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा घडवून आणणे भाग आहे. सर्वांनाच अशा साथींवरील लसी व औषधे समानपणे उपलब्ध करून देणे गरजेचे ठरेल. भारताने कोरोनाची साथ रोखण्यासाठी प्रचंड प्रमाणात लसीकरणाची मोहीम हाती घेतली होती. भारतीय नागरिकांचे जवळपास 90 टक्के इतक्या प्रमाणात पूर्ण लसीकरण झालेले आहे. तर पाच कोटी मुलांनाही कोरोनाची लस मिळालेली आहे. भारताने जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेल्या चार लसींचे उत्पादन सुरू केले आहे. भारताकडे वर्षभरात कोरोनाच्या लसींचे 500 कोटी डोसची निर्मिती करण्याची क्षमता आहे, अशी माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली.

द्विपक्षीय सहकार्य व कोव्हॅक्स इनिशिएटीव्हच्या माध्यमातून भारताने आत्तापर्यंत 98 देशांना कोरोनाच्या लसींचे 20 कोटी डोस पुरविलेले आहेत, ही बाब पंतप्रधानांनी या व्हर्च्युअल समिटमध्ये लक्षात आणून दिली. त्याचवेळी कोरोनासारख्या साथींचा मुकाबला करण्यासाठी पुढच्या काळात जागतिक व्यापारी परिषदेने आपल्या नियमात आवश्यक असलेले बदल करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.

दरम्यान, भारताने कोरोनाच्या लसीकरणाबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पारंपरिक औषधांच्या वापराचाही पुरस्कार केला होता व याचा कोरोनाविरोधी लढ्यात मोठा लाभ झाला, याकडे पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले. यामुळे कित्येकजणांचे प्राण वाचले आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी यावर समाधान व्यक्त केले. भारताच्या पारंपरिक उपचारपद्धतींचे हे ज्ञान जगाला उपलब्ध व्हावे, यासाठी गेल्याच महिन्यात ‘डब्ल्यूएचओ सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन इन इंडिया’ची पायाभरणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

leave a reply