अमेरिकेची एफ-१८ विमाने सौदीमध्ये तैनात

वॉशिंग्टन – आखातातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने सौदी अरेबियामध्ये ‘एफ-१८’ हॉर्नेट लढाऊ विमाने तैनात केली आहे. सौदीच्या प्रिन्स सुल्तान हवाईतळावर या विमानांची तैनाती केल्याची माहिती अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड -सेंटकॉम’ने दिली. इस्रायल-गाझापट्टीतील संघर्ष तसेच येमेनमधील हौथी बंडखोरांचे हल्ले, या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या या नव्या तैनातीकडे पाहता येईल, असा दावा इराणी वृत्तवाहिनी करीत आहे. दरम्यान, ग्रीस देखील सौदी अरेबियासाठी पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा रवाना करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

अमेरिकेची एफ-१८ विमाने सौदीमध्ये तैनातआखातातील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अमेरिकेच्या सेंटकॉमने सोशल मीडियाद्वारे सौदीतील एफ-१८ विमानांच्या तैनातीची माहिती दिली. एकूण किती एफ-१८ विमाने सौदीमध्ये तैनात केल्याचे सेंटकॉमने स्पष्ट केलेले नाही. पण सेंटकॉमच्या हद्दीत सुरक्षा व स्थैर्य कायम राखण्यासाठी ही तैनाती केल्याचे सेंटकॉमच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

इस्रायल आणि गाझापट्टीतील दहशतवाद्यांमधील संघर्ष वाढत चालला आहे. लेबेनॉनमधूनही इस्रायलच्या सीमाभागात तीन रॉकेट हल्ले झाले होते. इस्रायल व गाझातील हा संघर्ष युद्धाच्या दिशेने पावले टाकत असल्याचा इशारा याआधीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांनी दिला होता. अशा परिस्थितीत, येत्या काळात हा संघर्ष पेटल्यास सौदीतील एफ-१८ विमानांची तैनाती अमेरिकेच्या सेंटकॉमसाठी सहाय्यक ठरू शकते, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.अमेरिकेची एफ-१८ विमाने सौदीमध्ये तैनात

दरम्यान, गेल्या महिन्यात ग्रीसने सौदीबरोबर ‘पॅट्रियॉट’ यंत्रणेच्या सहकार्याबाबत विशेष करार केला होता. या करारानुसार, ग्रीस सौदीला सहा पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा भाडेतत्वावर देणार आहे. यापैकी पहिली पॅट्रियॉट यंत्रणा लवकरच सौदीमध्ये दाखल होईल, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

सौदीतील पॅट्रियॉटची ही तैनाती म्हणजे पुढच्या काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याचे दिसते. ग्रीस आणि सौदीमधला सदर करार तुर्की व इराणसाठी इशारा असल्याचा दावा आखाती विश्‍लेषकांनी केला होता.

leave a reply