अमेरिकी लढाऊ विमानाचे इराणच्या प्रवासी विमानाजवळून उड्डाण

America-Iranतेहरान – सिरियाच्या हवाई हद्दीत अमेरिकेच्या लढाऊ विमानाने इराणच्या प्रवासी विमानाजवळून धोकादायकरित्या उड्डाण केले. अमेरिकी लढाऊ विमानाच्या या कारवाईमुळे आपल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप इराणने केला आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या या आगळिकीला योग्य प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. पण आपल्या विमानाने आंतररा़ष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून इराणच्या विमानाजवळून टेहळणी केल्याचे अमेरिकेने जाहीर केले.

इराणची राजधानी तेहरानपासून लेबेनानच्या बैरूतसाठी उड्डाण केलेल्या प्रवासी विमानाबाबत ही घटना घडली. महान एअरलाईन्सचे प्रवासी विमान सिरियाच्या हवाई हद्दीत दाखल झाल्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच दोन लढाऊ विमानांनी सदर विमानाबरोबर उड्डाण सुरू केले. यापैकी एका विमानाने अतिशय जवळून प्रवास केल्याचा आरोप इराणने केला. त्यामुळे आपल्या वैमानिकाला विमान “नोज् डाइव्ह” म्हणजे विमान जमिनीच्या दिशेने झोकून द्यावे लागले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली तर काही प्रवासी जखमी झाल्याचा आरोप इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला. या घटनेनंतर काही काळासाठी या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता.

America-Iranसुरुवातीला इराणच्या माध्यमांनी विमानातील प्रवाशांच्या हवाल्याने या धोकादायक उड्डाणासाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. इस्रायली विमानांनी सिरियाच्या हवाई हद्दीत घुसून ही कारवाई केल्याचा ठपका इराणच्या माध्यमांनी ठेवला होता. तर इस्रायली यंत्रणांनी परदेशी माध्यमांकडून केल्या जाणार्‍या आरोपांना उत्तर देण्याचे टाळले. मात्र पुढच्या काही तासातच इराणच्या सरकारने प्रवासी विमानाच्या वैमानिकाच्या हवाल्याने, या घटनेसाठी अमेरिकेची एफ-१५ लढाऊ विमाने जबाबदार असल्याचा आरोप केला. अमेरिकेने देखील हवाई टेहळणी करीत असलेल्या आपल्या विमानांनी इराणच्या प्रवासी विमानापासून सुरक्षित अंतर ठेवून उड्डाण केल्याचे म्हटले आहे. तसेच सिरियातील आपल्या विमानांची हवाई गस्त पूर्णपणे कायदेशीर असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

दरम्यान, इराणचे ‘महान एअरलाईन्स’चे विमान अमेरिका आणि इस्रायलने याआधीच काळ्या यादीत टाकले आहे. दहशतवाद समर्थक कारवायांमध्ये गुंतलेले असल्याचा आरोप करून अमेरिकेने सदर विमान कंपनीवर निर्बंध लादले आहेत. तर दोन महिन्यांपूर्वी सदर विमान कंपनीशी सहकार्य ठेवले म्हणून अमेरिकेने चीनच्या कंपनीवरही कारवाई केली होती.

leave a reply