तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी संरक्षणमंत्र्यांचा अफगाणिस्तानचा दौरा

काबुल – अमेरिकेचे हंगामी संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर मिलर यांनी मंगळवारी अफगाणिस्तानला अघोषित भेट दिली. या भेटीत मिलर यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांची भेट घेऊन येथील अमेरिकेच्या लष्करी सहाय्याची माहिती घेतली. गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी अफगाणिस्तानचा गोपनीय दौरा केला होता. अफगाणिस्तानात तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अवघ्या आठवड्याभरातील या भेटीकडे गांभीर्याने पाहिले जाते.

गेल्या तीन महिन्यांपासून अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. या तीन महिन्यांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानात ३८ आत्मघाती हल्ले तर ५०७ बॉम्बस्फोट केले आहेत. यामध्ये ४८७ हून अफगाणींचा बळी गेला असून हजाराहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या सरकारने प्रसिद्ध केली होती. दरदिवशी तालिबान हल्ले चढवून अफगाणी जवानांसह स्थानिकांनाही लक्ष्य करीत आहेत. राजधानी काबुलसह हेल्मंड, कंदहार, पाकतिया, नांगरहार या प्रांतांमध्ये तालिबानने प्रचंड प्रमाणात रक्तपात घडविल्याची टीका अफगाणी सरकारने केली होती. संयुक्त राष्ट्रसंघानेही तालिबानच्या या कारवायांवर चिंता व्यक्त केली होती.

तालिबानच्या या हल्ल्यांची दखल घेऊन अमेरिकेने देखील त्यावर ताशेरे ओढले होते. तसेच अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असली तरी येथील दहशतवादविरोधी कारवाया सुरू राहणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले होते. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी देखील तालिबानच्या हल्ल्यांवर टीका करून अफगाणी जनतेला शांती हवी असल्याचे म्हटले होते. तर अफगाणिस्तानातील अमेरिका व नाटो लष्कराचे संयुक्त कमांडर जनरल स्कॉट मिलर यांनी तालिबान स्वतःच्या फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर करीत आहे. तालिबानला हिंसेचा मार्ग सोडायचाच नाही, असा ठपका ठेवला होता.

अमेरिकेचे हंगामी संरक्षणमंत्री मिलर यांनी देखील अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अमेरिकेच्या सैन्यमाघारीबाबत बोलताना तालिबानला इशारा दिला होता. तालिबानबरोबर केलेल्या करारानुसार, अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असली तरी, अफगाणी लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईसाठी हवाई आणि लष्करी सहाय्य पुरविणार असल्याचे मिलर यांनी म्हटले होते.

leave a reply