अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी सौदीचे लष्करी सहाय्य रोखले

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल करणारे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदी अरेबियाचे लष्करी सहाय्य रोखले आहे. ‘येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात सौदीला मिळत असलेला शस्त्रास्त्रांचा पुरवठा यापुढे केला जाणार नाही. येमेनचा प्रश्‍न राजकीय वाटाघाटीतून सोडविला जाईल’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली. राजकीय वाटाघाटींसाठी पुढाकार घेणार्‍या अमेरिकेच्या या निर्णयाचे सौदी अरेबियाने स्वागत केले. पण बायडेन प्रशासनाचा हा निर्णय हौथी बंडखोरांना सहाय्य करणार्‍या इराणच्या फायद्याचा आणि इस्रायलसाठी धोक्याचा ठरेल, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

‘अमेरिका इज बॅक. डिप्लोमसी इज बॅक’, असे सांगत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय मागे घेतले. यामध्ये येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात संघर्ष करणार्‍या सौदीला लष्करी सहाय्य पुरविण्याचा निर्णय देखील आहे. येमेनधील संघर्षाने या देशात मानवतावादी संकट निर्माण केल्याची टीका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली. हे संकट टाळण्यासाठी, येमेनचे युद्ध थांबविण्यासाठी यापुढे अमेरिकेकडून सौदीला दिले जाणारे लष्करी सहाय्य रोखल्याचे बायडेन यांनी जाहीर केले.

‘येमेनमधील युद्धामुळे येथील जनता न संपणार्‍या विनाशाला सामोरे जात आहे. येमेनच्या जनतेला या विनाशापासून रोखण्यासाठी अमेरिका मानवतावादी सहाय्य पुरविणार आहे’, असे बायडेन यांनी सांगितले. यासाठी टिमोथी लेंडर्कींग यांना विशेषदूत म्हणून नियुक्त केल्याचे बायडेन म्हणाले. त्याचबरोबर येमेनमधील हादी सरकार आणि हौथी

बंडखोरांमध्ये राजकीय वाटाघाटी घडवून हा संघर्ष संपविण्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्पष्ट केले. या घोषणेबरोबर हौथींना दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकण्याचा माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णयही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी निकालात काढला.

येमेनमधील संकटावर राजकीय तोडगा काढण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचे सौदी अरेबियाने स्वागत केले. यासाठी येमेनच्या दोन्ही गटांमध्ये वाटाघाटी सुरू करण्यालाही आपला पाठिंबा असल्याचे सौदीने जाहीर केले. पण इस्रायलमधील माध्यमे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेवर चिंता व्यक्त करीत आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची घोषणा म्हणजे हौथी बंडखोर व त्यांची पाठराखण करणार्‍या इराणसाठी विजय असल्याचे इस्रायली माध्यमे लक्षात आणून देत आहेत. या निर्णयामुळे येमेनमध्ये अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संघर्षाच्या आडून इराणने येमेनमध्ये आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली आहे. यामध्ये सौदीची राजधानी रियाध किंवा इस्रायलच्या दक्षिणेकडील शहरांपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांचा समावेश होता, याची आठवण इस्रायली माध्यमे करून देत आहेत. दरम्यान, महिन्याभरापूर्वी येमेनमधील हौथी बंडखोरांनीच आपल्याकडे इस्रायलपर्यंत हल्ला चढविण्याची क्षमता असल्याची घोषणा केली होती.

leave a reply