इराणच्या कुद्स फोर्सेसच्या अधिकाऱ्यांवर अमेरिकेचे निर्बंध

कुद्सवॉशिंग्टन – इराणबरोबरील अणुकरारावर ठाम असल्याचे दावे करणाऱ्या बायडेन प्रशासनाने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागाने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या कुद्स फोर्सेसच्या अधिकाऱ्यांना या निर्बंधांतर्गत लक्ष्य केले. त्याचबरोबर अमेरिकेने ‘आयएस’, बोको हराम या दहशतवादी संघटनांच्या सदस्यांनाही निर्बंधांच्या यादीत टाकले आहे.

अमेरिकेच्या कोषागार विभागाशी संबंधित ‘टेररिस्ट फायनान्सिंग टार्गेटिंग सेंटर-टीएफटीसी’ या विभागाने आफ्रिका आणि आखातातील दहशतवादी कारवायांशी जोडलेल्या संघटना तसेच व्यक्तींवर निर्बंधांची घोषणा केली. टीएफटीसी हा विभाग दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या पैशावर लक्ष ठेवून असतो. आखातातील सौदी अरेबिया, युएई, बाहरिन, ओमान, कुवैत आणि कतार या अमेरिकेच्या सहकारी देशांकडून यासंबंधी मिळालेल्या माहितीच्या आधारावर टीएफटीसीचा अहवाल तयार केला जातो.

या पार्श्वभूमीवर, टीएफटीसीने जाहीर केलेल्या निर्बंधांच्या नव्या यादीत 16 जणांना सामील करण्यात आले आहे. यामध्ये इराणच्या कुद्स फोर्सेसशी संबंधित अली कासिर, मघदाद अमिनी आणि मोर्तझा हाशेमी यांचा समावेश आहे. कासिर हा कुद्स फोर्सेसच्या आखातातील यंत्रणेतील मुख्य अधिकारी मानला जातो. कासिर आणि मघदाद कुद्स फोर्सेसचे आर्थिक व्यवहार पाहतात. मोर्तझा हाशेमी हा चीनस्थित इराणी व्यापारी आहे. हाशेमीने दोन चिनी नागरिकांच्या नेटवर्कचा वापर करून अमेरिकन बनावटीच्या साहित्याची खरेदी केली होती, असे टीएफटीसीने म्हटले आहे.

कुद्सतसेच बाहरिनमधील इराणसमर्थक सराया अल-अश्तर आणि सराया अल-मुख्तार या दोन संघटनांवरही निर्बंधांची कारवाई केली. याशिवाय इराक-सिरियात प्रभाव असलेल्या आयएस आणि नायजेरियातील बोको हरामवरही नवे निर्बंध लादले. पण अमेरिकेच्या कोषागार विभागाच्या या यादीमध्ये इराणसंलग्न संघटनांचा समावेश लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये अमेरिकेच्या कोषागार विभागाने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या कुद्स फोर्सेसवर दुसऱ्यांदा निर्बंध लादले आहेत. याआधी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले होते. अमेरिकेच्या या निर्णयावर इराणने टीका केली होती. पण गेल्या वर्षापासून बायडेन प्रशासनाने अणुकरारासाठी पावले उचलल्यानंतर इराणने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती. अणुकरारासाठी इराणची ही मागणी मान्य करण्याचे संकेत बायडेन प्रशासनाने दिले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध निराळे संकेत देत आहेत.

इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग करीत आहे. त्याचवेळी अणुकरारासाठी इराणने बायडेन प्रशासनासमोर ठेवलेल्या शर्ती अत्यंत कडक आहेत. त्या मान्य करणे बायडेन प्रशासनाला सध्या तरी शक्य नसल्याचे दिसते. कारण विरोधी पक्षाबरोबरच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सत्ताधारी पक्षाचे संसद सदस्य देखील इराणच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारण्याची मागणी करीत आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणवर टाकलेले निर्बंध लक्षणीय ठरत आहेत.

leave a reply