अमेरिकेकडून उत्तर कोरियाला नव्या कठोर निर्बंधांचा इशारा

संयुक्त राष्ट्र – लवकरच उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून अणुचाचणी घेऊ शकतो, असे दक्षिण कोरियाच्या लष्कराने बजावले आहे. असे झाले तर अमेरिका उत्तर कोरियावर नवे कठोर आर्थिक निर्बंध लादेल, असा इशारा अमेरिकेने दिला. निर्बंधांपासून उत्तर कोरियाचा बचाव करणाऱ्या चीन व रशियाची अमेरिका पर्वा करणार नसल्याचे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी बजावले आहे.

अमेरिकेकडून उत्तर कोरियाला नव्या कठोर निर्बंधांचा इशारागेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेने उत्तर कोरियाविरोधी प्रस्ताव सादर केला होता. गेल्या पाच महिन्यांमध्ये क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावून पूर्व आशियात तणाव निर्माण करणाऱ्या उत्तर कोरियावर निर्बंध लादण्याची मागणी अमेरिकेने या प्रस्तावाद्वारे केली होती. पण चीन व रशियाने नकाराधिकार वापरुन उत्तर कोरियावरील निर्बंध उधळून लावले होते.

मात्र यापुढे उत्तर कोरियाने अणुचाचणी केलीच तर या देशावरील निर्बंध अटळ आहेत, असा इशारा राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी दिला. हे निर्बंध अधिक कठोर असतील, असे अमेरिकेच्या राजदूतांनी बजावले. दरम्यान, उत्तर कोरिया आण्विक सज्जतेवर ठाम आहे. अमेरिकेच्या दबावासमोर माघार घेणारे देश अधिक काळ टिकाव धरत नाहीत, हे लिबियाच्या उदाहरणावरुन स्पष्ट होते. त्यामुळे आपला देश आण्विक सज्जता सोडणार नसल्याची घोषणा उत्तर कोरियाने केली आहे.

leave a reply