वुहान लॅब लीक प्रकरणी अमेरिकन लोकप्रतिनिधींच्या चीनवर कारवाईसाठी हालचाली सुरू

वॉशिंग्टन – अमेरिकेचे सिनेटर मार्को रुबिओ यांनी चीनवर निर्बंध टाकणार्‍या विधेयकासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या उगमाचा तपास करण्यासाठी चीनने अपेक्षित सहकार्य केले नाहीत, तर अमेरिकन संसदेत हे विधेयक मांडले जाईल, अशी माहिती मार्को रुबिओ यांनी दिली. एकाच दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी कोरोनाच्या तपासाबाबत चीनने सहकार्य न केल्यास, हा देश आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडेल, असे बजावले होते. जी७च्या बैठकीत सदस्यदेशांनी चीनला अशाच स्वरुपाचा संदेश दिला होता. यामुळे चीनवरील दडपण अधिकाधिक वाढत चालल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

वुहान लॅब लीक प्रकरणी अमेरिकन लोकप्रतिनिधींच्या चीनवर कारवाईसाठी हालचाली सुरूवुहान लॅब लीक अर्थात चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू जगभरात फैलावला, या दाव्यांना बळ देणारी माहिती माध्यमांमध्ये येत आहे. इतकेच नाही तर कोरोनाचा विषाणू म्हणजे चीनचे जैविक शस्त्र होते व चीन फार आधीपासून यावर काम करीत होता, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वर्तमानपत्रांनी तसेच संशोधकांनी उघड केली आहे. यामुळे कोरोनाचा विषाणू नैसर्गिक असल्याचे दावे आता मागे पडले असून सारे जग चीनकडे संशयाने पाहू लागले आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने आपले पथक पाठवून चीनमध्ये कोरोनाच्या उगमाबाबत केलेल्या तपासाला चीनने सहकार्य केले नव्हते, ही बाब देखील जगासमोर आलेली आहे.

याचे परिणाम दिसू लागले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या गुप्तचर विभागाला कोरोनाच्या उगमाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर अमेरिकेचे विरोधी पक्षनेते या प्रश्‍नावर चीनला धारेवर धरण्याची मागणी करीत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर मार्को रुबिओ यांनी देखील चीनवर संशय व्यक्त केला आहे. ‘जर चीनला कोरोनाबाबत आवश्यक तो तपास करायचा असता, तर हा तपास या देशाने गेल्या १८ महिन्यांमध्येच सुरू केला असता’, याकडे रुबिओ यांनी लक्ष वेधले.

चीन तसे करीत नाही, याचे कारण अगदी उघड आहे. कारण कोरोनाच्या उगमाचा तपास झाल्यानंतर त्याची जी काही माहिती समोर येतील, त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळेल, याची चिंता या देशाला वाटत आहे, असे सिनेटर मार्को रुबिओ म्हणाले. म्हणूनच चीनने कोरोनाच्या तपासाबाबत सहकार्य करण्यास नकार दिला तर या देशावर कठोर निर्बंध लादण्याची तयारी आपण केली आहे व यासाठी विधेयक तयार करीत असल्याचे संकेत रुबिओ यांनी दिले. या विधेयकाचे तपशील रुबिओ यांनी जाहीर केलेले नाहीत. मात्र यामध्ये चीनच्या संशोधकांना लक्ष्य केले जाईल व अमेरिकेकडून चीनला मिळणारे अर्थसहाय्य व चीनबरोबरील अमेरिकेचे संशोधन बंद पाडले जाईल, अशी दाट शक्यता वर्तविली जाते.

याच्या बरोबरीने चीनवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची तरतूद या विधेयकात असावी, असा दावा माध्यमांनी केलेला आहे. चीन आपल्याला सहाय्य करील, या आशेवर न राहता, अमेरिकेने चीनला सहकार्य करण्यास भाग पाडणारी पावले उचलावी, अशी मागणी रुबिओ यांनी केली. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात कोरोनाची साथ पसरवून लाखो जणांचा बळी घेणार्‍या चीनने अमेरिका व जगाला दहा ट्रिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. यासाठी अमेरिकेने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.

leave a reply