इस्रायलच्या मागे अमेरिका ठामपणे उभी आहे

- इस्रायलमधील अमेरिकन राजदूतांचा दावा

तेल अविव – सलग तीन दिवसांपासून इस्रायलवर गाझातून हल्ले होत असताना, या संघर्षात आपला देश इस्रायलच्या बाजूने उभा असल्याचा दावा अमेरिकेच्या इस्रायलमधील राजदूतांनी केला. राजदूत टॉम निडेस यांनी हा संघर्ष त्वरित थांबावा यासाठी अमेरिका काम करीत असल्याचेही म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने इस्रायलसंदर्भात स्वीकारलेली भूमिका लक्षात घेताना राजदूत टॉम निडेस यांनी केलेली विधाने लक्ष वेधून घेणारी आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून इस्रायल व अमेरिकेचे संबंध ताणलेले आहेत.

इस्रायलच्या मागे अमेरिका ठामपणे उभी आहे - इस्रायलमधील अमेरिकन राजदूतांचा दावाअमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला इस्रायलच्या पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनबाबत स्वीकारलेली आक्रमक भूमिका मान्य नाही. विशेषतः पूर्व जेरूसलेममध्ये इस्रायली नागरिकांसाठी उभारल्या जात असलेल्या नव्या वस्त्यांना बायडेन प्रशासनाचा विरोध आहे. युरोपिय देशांनीही या प्रकरणी नेत्यान्याहू यांच्या सरकारला विरोध करणारी भूमिका स्वीकारली होती. पण यापुढे इस्रायल इतर देशांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करून आपली हानी करून घेणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अमेरिका व युरोपिय देशांना ठणकावले होते.

यामुळे इस्रायलचे अमेरिकेबरोबरील संबंध ताणल्याचे स्पष्टपणे दिसू लागले होते. याचा लाभ घेण्याची सूचना इराणने पॅलेस्टिनी संघटनांना केली होती. यानंतरच्या काळात पॅलेस्टिनी संघटनांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले होते. पूर्व जेरूसलेममध्ये इस्रायल व पॅलेस्टिनींमध्ये झालेल्या संघर्षामुळे पॅलेस्टाईनमधल्या कट्टर संघटनांना इस्रयालला लक्ष्य करण्याची संधी देखील मिळाली होती. याचे परिणाम दिसू लागले असून इस्रायलवरील रॉकेट्स व मॉर्टरच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

अशा परिस्थितीत इस्रायली विश्लेषकांनी आपल्या देशाच्या सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त केली होती. पण अमेरिकेच्या राजदूतांनी आपला देश या संघर्षात इस्रायलच्या बाजूने उभा असल्याचे सांगून दोन्ही देशांमधील सहकार्य अबाधित असल्याचा संदेश दिला आहे. हा संदेश केवळ शाब्दिक नाही, हे देखील अमेरिकेने दाखवून दिले आहे. इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चीनने ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण अमेरिकेने चीनचा हा प्रयत्न उधळून लावल्याच्या बातम्या येत आहेत. इराण व सौदीमध्ये यशस्वीरित्या समेट घडवून आणण्याचे श्रेय चीनला मिळाले आहे. त्यानंतर इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये शांतीचर्चा घडवून आणण्यासाठी चीनने पुढाकार घेतला होता. यानंतर अमेरिकेने चीनला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची संधी मिळणार नाही, याची दक्षता अमेरिका घेत असल्याचे या निमित्ताने समोर आले. सुरक्षा परिषदेतील अमेरिकेचा हा निर्णय व अमेरिकेच्या राजदूतांनी इस्रायलला दिलेले आश्वासन पाहता, सध्या तरी इस्रायलच्या सरकारबरोबरील मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी बायडेन प्रशासनाने केलेली असावी, असे संकेत मिळत आहेत.

हिंदी

 

leave a reply