अफगाणिस्तानातील सैन्यमाघार अमेरिकेचे धोरणात्मक अपयश

- अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांची कबुली

वॉशिंग्टन/काबुल – अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा निर्णय योग्यच होता, असे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन त्याचे समर्थन करीत आहेत. पण अमेरिकन सिनेटसमोरील सुनावणीत संरक्षणदलप्रमुख आणि सेंटकॉमच्या प्रमुखांनी बायडेन यांचे दावे खोडून काढणारी विधाने केली. अफगाणिस्तानात किमान २,५०० जवान तैनात ठेवून माघार घेण्याचा प्रस्ताव दिला होता, असे सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी म्हणाले. तर अफगाणिस्तानातील सैन्यमाघार ही अमेरिकेचे धोरणात्मक अपयश असल्याची कबुली संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी दिली.

महिन्याभरापूर्वी अफगाणिस्तानातून घेतलेल्या पूर्ण सैन्यमाघारीवर अमेरिकेत मोठे वादळ पेटले आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याची तर काहींनी बायडेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या निर्णयात त्यांना साथ देणार्‍या पेंटॅगॉनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांना सेवेतूनच बडतर्फ करण्याची मागणी झाली होती. या सैन्यमाघारीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची अप्रतिष्ठा झाली असून याचा फायदा चीन व रशिया या अमेरिकेच्या शत्रूदेशांना मिळेल, असे आरोप रिपब्लिकन सिनेटर्सनी केले.

या पार्श्‍वभूमीवर, सिनेट आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटीसमोर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन, संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले आणि सेंट्रल कमांड-सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांची सुनावणी झाली. यात अमेरिकेच्या दोन्ही वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी दिलेली माहिती राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या महिन्याभरात केलेले दावे खोटे पाडणारी आहे. ‘अफगाणिस्तानातील परिस्थिती समजून घेण्यात आपण अपयशी ठरलो, हे अस्वस्थ करणारे सत्य अमेरिकेला स्वीकारावे लागेल’, असे जनरल मिले म्हणाले.

‘विशिष्ट व आवश्यक उद्दिष्टे गाठल्याशिवाय वेगवान माघार घेतली तर अफगाणिस्तानात आत्तापर्यंत कमावलेले सारे काही गमावून बसू. यामुळे अमेरिका जगभरातील आपली विश्‍वासार्हता गमावून बसेल, अफगाणिस्तानातील सरकार कोसळेल, तालिबान सत्तेवर येईल किंवा गृहयुद्ध भडकेल, याबाबत मी विश्‍लेषण केले होते’, असे जनरल मिले यांनी सिनेटसमोरील सुनावणीत स्पष्ट केले आहे. तसेच ही सैन्यमाघार अमेरिकेसाठी धोरणात्मक अपयश ठरल्याचे जनरल मिले यांनी मान्य केले.

सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅकेन्झी यांनी देखील अफगाणिस्तानातील पूर्ण सैन्यमाघारीला आपला विरोध होता, असे सांगितले. ‘अफगाणिस्तानात किमान २,५०० जवान तैनात असावे. अन्यथा अफगाणिस्तानातील सरकार व लष्करी व्यवस्था कोसळेल, असे माझे म्हणणे होते’, असे जनरल मॅकेन्झी यांनी सांगितले. पण या दोन्ही लष्करी अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा निर्णय चुकीचा असल्याची थेट टीका करण्याचे टाळले. पण अफगाणिस्तानातील पूर्ण सैन्यमाघारीचा निर्णय घेण्याआधी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या दोन्ही लष्करी अधिकार्‍यांच्या सूचनेकडे सपशेल दुर्लक्ष केल्याची टीका अमेरिकेतील माध्यमे व विश्‍लेषक करीत आहेत.

दरम्यान, जनरल मिले आणि जनरल मॅकेन्झी यांच्या या कबुलीनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर हल्ला चढविला. संपूर्ण सैन्यमाघारीचा निर्णय बालिशपणे घेण्यात आला व याला बायडेन प्रशासन जबाबदार असल्याची जळजळीत टीका ट्रम्प यांनी केली आहे.

leave a reply