युक्रेनच्या समस्येवर राजनैतिक वाटाघाटीतूनच मार्ग निघेल

संयुक्त राष्ट्रसंघ – ‘युक्रेनमधील परिस्थितीवर भारत बारकाईने नजर ठेवून आहे. या देशात भारताचे २० हजाराहून अधिक नागरिक असून त्यांची सुरक्षा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे. युक्रेन व रशियामध्ये निर्माण झालेला तणाव लवकरात लवकर निवळावा आणि यासाठी राजनैतिक वाटाघाटींखेरीज दुसरा पर्याय नाही’, अशा स्पष्ट शब्दात भारताने आपली भूमिका मांडली.

Ukraine-issueडोनेस्क आणि लुहास्क हे युक्रेनचे प्रांत स्वतंत्र देश बनल्याची घोषणा करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी सार्‍या जगाला धक्का दिला. याचे तीव्र पडसाद संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत उमटले. या प्रश्‍नावर सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली. यावेळी अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर जबरदस्त आगपाखड केली. सुरक्षा परिषदेचा सदस्य असलेल्या भारताने या प्रश्‍नावरील आपली आधीचीच तटस्थ भूमिका कायम ठेवली.

सुरक्षा परिषदेत बोलताना भारताचे राजदूत टी. एस. तिरूमुर्ती यांनी परखड शब्दात राजनैतिक वाटाघाटींच्या मार्गानेच हा प्रश्‍न सुटेल, असे बजावले. तसेच इथला तणाव लवकरात लवकर निवळावा यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा राजदूत तिरूमुर्ती यांनी व्यक्त केली. रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या मिन्स्क कराराची आठवण करून देऊन याच्या चौकटीत हा प्रश्‍न सोडविला जावा, अशी मागणी भारताने केली आहे. तसेच युक्रेनमध्ये असलेल्या वीस हजाराहून अधिक भारतीयांच्या सुरक्षेला भारताचे सरकार सर्वोच्च प्राधान्य देईल, असे राजदूत तिरूमुर्ती यांनी जाहीर केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील युक्रेनची समस्या सामोपचाराने सोडविली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारताला शांतता हवी आहे आणि भारत कायम शांततेसाठी प्रयत्न करीत राहिल, असे राजनाथ सिंग पुढे म्हणाले. युक्रेनमधील २४० भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी पाठवलेले विमान मंगळवारी रात्री दहा वाजता नवी दिल्लीच्या विमानतळावर उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने इतर प्रवासी विमान कंपन्या युक्रेनमधील भारतीयांना आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली आहे.

leave a reply