अमेरिकेचा सहकारी असलेल्या भारताच्या ऐवजी अमेरिकेचे हजारो सैनिक इस्लामाबादमध्ये काय करीत आहेत?

- पाकिस्तानच्या विरोधी पक्षनेत्यांचा सवाल

इस्लामाबादमध्येइस्लामाबाद – अफगाणिस्तानातून बाहेर पडलेले हजारो अमेरिकन सैनिक पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तानच्या सरकारने इस्लामाबादमधल्या हॉटेल्समध्ये अमेरिकन सैन्यासाठी रूम्स बुक केल्याचा आरोप पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते करीत आहेत. भारत हा अमेरिकेचा धोरणात्मक सहकारी देश असताना, अफगाणिस्तानातून बाहेर पडलेल्या अमेरिकन सैन्याचे वास्तव्य पाकिस्तानच्या राजधानीत कशासाठी? असा प्रश्‍न विचारून विरोधी पक्ष व माध्यमे पाकिस्तानच्या सरकारला धारेवर धरत आहेत. मात्र अमेरिकन सैन्याचे इस्लामाबादमधील वास्तव्य तात्पुरते असल्याचा बचाव अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी केला आहे.

अफगाणिस्तानलगतच्या तोर्खम सीमेवरून सुमारे 2,192 व हवाई मार्गाने सुमारे 1,627 अमेरिकी सैनिक इस्लामाबादमध्ये आले आहेत. काही अमेरिकी सैनिक चमन येथील सीमेवरून इथे दाखलझाले. पण ही अफगाणिस्तानच्या सैन्यमाघारीनंतरची सर्वसाधारण बाब ठरते. हे अमेरिकेचे सैनिक इस्लामाबादमध्ये दिर्घकाळासाठी नाही, तर अवघ्या 21 ते 30 दिवसांसाठीच असतील. इतक्या मुदतीचा व्हिसा त्यांना देण्यात आलेला आहे, असे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी स्पष्ट केले. पण त्यांचा हा बचाव विरोधकांकडून स्वीकारला जाण्याची अजिबात शक्यता नाही.

अफगाणिस्तानातील माघारीनंतर अमेरिका पाकिस्तानातील तळावर आपले सैन्य तैनात करील, असे संकेत अमेरिकेने दिली होते. त्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी बाणेदारपणे ‘ॲब्सुल्युटली नॉट्’ अर्थात अजिबात शक्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. याचे त्यांच्या समर्थकांनी स्वागतही केले. पण आता पंतप्रधान इम्रानखान यांचे सरकार अमेरिकेच्या दडपणासमोर झुकले आहे. इस्लामाबादमध्ये दाखल झालेले हजारो अमेरिकन सैनिक हेच दाखवून देत आहेत, अशी टीका पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सुरू झाली होती. या अमेरिकन सैनिकांसाठी पाकिस्तानच्या सरकारनेच इस्लामाबादमधली हॉटेल्स रिकामी करून रूम बुक केले होते, असा आरोप ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम’ या विरोधी पक्षाचे नेते मौलाना फझलूर रेहमान यांनी केला. ‘भारत हा अमेरिकेचा धोरणात्मक सहकारी देश असताना, अमेरिकेचे सैन्य पाकिस्तानच्या राजधानीत कशासाठी आले. अमेरिकेचे सैन्य भारतात का गेले नाही?’ असा प्रश्‍न ‘जमात-ए-इस्लामी’ पक्षाचे प्रमुख ‘सिराज उल हक’ यांनी पाकिस्तानच्या सरकारला केला आहे. अफगाणिस्तानबाबत अमेरिकेला पाकिस्तानने इतके सहाय्य करूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या पंतप्रधाशी फोनवरून बोलायला तयार नाहीत, याकडेही सिराज उल हक यांनी लक्ष वेधले.

9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकाला अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी पाकिस्तानचे तत्कालिन हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी दाखविली होती. इम्रानखान यांच्या सरकारने पाकिस्तानला पुन्हा मुर्शरफ यांच्या काळात नेऊन ठेवले आहे का, असे शेरे सोशल मीडियावर मारले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्येष्ठ पत्रकारांनीही अमेरिकेचे सैन्य भारतात न जाता, पाकिस्तानमध्ये कशासाठी थांबले आहे, यावर आश्‍चर्य व्यक्त केले.

आधीच्या काळात स्वाभिमान दाखविणारे पाकिस्तानचे सरकार आता मात्र अमेरिकेच्या दडपणाखाली झुकले आहे, हा आरोप अमेरिकन सैनिकांच्या इस्लामाबादमधील वास्तव्यामुळे अधिकच तीव्र झाला आहे. तसेच अमेरिका व पाकिस्तानच्या सरकारमध्ये एखादा छुपा करार झालेला आहे का, असे असेल तर या डीलची माहिती सार्वजनिक का केली जात नाही? अशी चर्चाही पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये सुरू झालेली आहे. तसेच पाकिस्तानच्या सरकारने अमेरिकेबरोबर गुप्तपणे सहकार्य केले असेल, तर तालिबानचा रोष पाकिस्तानला सहन करावा लागेल, याचीही जाणीव पाकिस्तानचे विश्‍लेषक आपल्या सरकारला करून देत आहेत.

‘तेहरिक-ए-तालिबान’ या पाकिस्तानात घातपात माजविणाऱ्या दहशतवादी संघटनेचे नेते व सदस्य अफगाणिस्तानात तालिबानच्या आश्रयाखाली आहेत. त्यांचा वापर करून तालिबान पाकिस्तानात घातपाताचे भयंकर सत्र सुरू करू शकतो. ही व्यूहरचना करून तालिबानने पाकिस्तानलाच वेठीस धरलेले आहे, याकडे हे पाकिस्तानी विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या पाकिस्तानला याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. पाकिस्तानातील बुद्धिमंतांनी तशी पूर्वसूचना दिली होती. हा धोका आता प्रत्यक्षात उतरू लागला असून तालिबानचे समर्थक असलेल्या पाकिस्तानच्या कट्टरपंथिय पत्रकार व विश्‍लेषक तालिबानवर टीका सुरू केल्याचे दिसत आहे.

leave a reply