इराणचे हित साधणार असेल तरच अणुकरारावर चर्चा करू – इराणचे भावी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी

तेहरान – ‘अणुकार्यक्रमाच्या मुद्यावर इराण अजिबात तडजोड करणार नाही. वाटाघाटीच्या माध्यमातून इराणचे हित जपले जाणार नसेल, तर अशा अणुकरारावर चर्चा करण्यात इराणची इच्छा नाही’, अशा स्पष्ट शब्दात इराणचे राष्ट्राध्यक्ष नियुक्त इब्राहिम राईसी यांनी आपली धोरणे स्पष्ट केली. त्याचबरोबर क्षेपणास्त्रनिर्मिती आणि आखातातील इराणसमर्थक शियापंथिय गटांना असलेले समर्थन यापुढेही सुरू राहिल, असे राईसी यांनी ठणकावून सांगितले. अणुकराराबाबत इराणकडून अपेक्षा बाळगणार्‍या अमेरिका, युरोपिय देशांना इराणचे राष्ट्राध्यक्ष नियुक्त राईसी यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

अणुकरारावर चर्चागेल्या आठवड्यात इराणमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या इब्राहिम राईसी यांनी सोमवारी माध्यमांशी चर्चा केली. इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी सुधारणावादी आणि जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारे नेते म्हणून पाहिले जात होते. तर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या खास मर्जीतले राईसी हे प्रखर जहालमतवादी आहेत. सर्वोच्च नेते खामेनी यांची धोरणे राबवून घेण्यासाठीच राईसी यांची राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे राईसी यांच्या माध्यमांबरोबरच्या पहिल्या बैठकीकडे जगभराचे लक्ष लागले होते.

‘इराणच्या जनतेचे हित फक्त अणुकराराशी जोडलेले नाही. त्यामुळे इराणचे परराष्ट्र धोरण अणुकरारापर्यंत मर्यादित नसेल. यापुढे इराण जगातील इतरांशीही सहकार्य प्रस्थापित करील’, असे सांगून राईसी यांनी अणुकराराचे महत्त्व कमी केले. अणुकरारापेक्षाही इराणचे सार्वभौमत्व आणि हित सर्वात महत्वाचे असल्याचे राईसी यांनी स्पष्ट केले. इराणच्या राजकीय व्यवस्थेवर पकड असलेले सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांनी देखील याआधी हीच भूमिका मांडली होती. राष्ट्राध्यक्ष नियुक्त राईसी यांनी सर्वोच्च धार्मिक नेत्यांचीच भूमिका ठासून मांडली तसेच व्हिएन्ना येथील चर्चेतून बाहेर पडण्याचे संकेतही दिले.

अणुकराराबाबतच्या सद्यस्थितीसाठी सर्वस्वी अमेरिका आणि युरोपिय महासंघ जबाबदार असल्याचा ठपका राईसी यांनी ठेवला. अमेरिका आणि युरोपिय महासंघाने सदर करारातील नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप इराणच्या भावी राष्ट्राध्यक्षांनी केला. त्यामुळे या करारात सहभागी होण्याची आणि यातील नियमांचे पालन करण्याची जबाबदारी अमेरिकेवर असल्याचा दावा राईसी यांनी केला. त्याचबरोबर अणुकरारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेण्याची कुठलीही योजना नसल्याचे राईसी यांनी स्पष्ट केले.

याशिवाय क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम आणि आखातातील शियापंथिय सशस्त्र गटांचे समर्थन या मुद्यांवर इराणच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचे राईसी यांनी सांगितले. अणुकार्यक्रमाबरोबर इराणच्या क्षेपणास्त्रनिर्मितीवरही मर्यादा टाकाव्या, अशी मागणी पाश्‍चिमात्य देशांकडून केली जात होती. त्याचबरोबर आखातात अस्थैर्य निर्माण करणार्‍या इराणसंलग्न दहशतवादी संघटनांप्रकरणी इराणची कोंडी करावी, असे आवाहन आखाती देशांनी केले होते. पण या दोन्ही मुद्यांवर इराण तडजोड करणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष नियुक्त राईसी यांनी जाहीर केले.

दरम्यान, या बैठकीआधी व्हिएन्ना येथील वाटाघाटीत सहभागी झालेल्या इराणच्या प्रतिनिधींना माघारी बोलाविल्याच्या बातम्या आल्या होत्या.

leave a reply